Join WhatsApp Group
सामाजिक

संभाजी पुत्र शाहू महाराज स्मारकाचे आ. भरत गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन

५० लाखांचा निधी मंजूर ; शिवभक्तांनी केला आनंद साजरा

प्रतिनिधी – अरुण पवार  (  माणगाव ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या माणगाव तालुक्यातील जन्मस्थळ गांगवली येथील धर्मवीर संभाजी महाराज यांचे सुपुत्र युवराज छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रतोद आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मारकासाठी ५० लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. बऱ्याच वर्षांनी छत्रपती शाहू महाराज स्मारकाची मागणी पूर्ण होत असल्याने शिवभक्तांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला.

स्वराज्याची राजधानी असलेल्या गडांचा राजा रायगड किल्ल्याच्या जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र गांगवली येथील शिवकालीन भग्नावस्थेत असलेल्या वाड्याच्या परीसरात छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकासाठी शिवभक्त ॲड. अच्युत तोंडलेकर आणि ग्रामस्थ हे अनेक वर्षे मागणी करीत होते. ही मागणी पूर्ण होत असल्याने या परीसराचा कायापालट होणार आहे. रायगड किल्ल्याकडे जाणारा राजमार्ग गांगवली येथूनच जात असल्याने शिवभक्त येथे थांबून शाहू महाराज यांचे दर्शन घेतील अशी खात्री शिवभक्तांना वाटते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अमानुष मृत्यूपूर्वी पत्नी महाराणी येसूबाई यांच्या उदरात गांगवली येथील शिवकालीन वाड्यात जन्म झाला. त्या प्रसंगी राज्यातील परीस्थिती अत्यंत वाईट आणि बिकट होती. याचा फायदा घेऊन औरंगजेब याने सरदार झुल्फिकार खान याला रायगडला काबीज करण्यासाठी पाठविले होते. त्याकाळी सुरक्षित राहण्यासाठी रायगडच्या चोर दरवाजाने येसूबाई आपल्या कुटुंबासह गांगवली येथील वाड्यात काही दिवस थांबून शाहू महाराज यांना १८ मे १६८२ मध्ये जन्म दिला मात्र त्यानंतर सर्वांना कैद केले.

त्यानंतर सुमारे २० वर्ष नजरकैदेतून सोडले. शाहू महाराजांना १७०३ मध्ये ७,००० ची मनसबदारी देण्यात आली. १७०८ यावर्षी शाहू महाराज यांचा सातारा येथे राज्याभिषेक झाला. १७१९ मध्ये बाजीराव यांना पेशवे करण्यात आले. ८ जून १७३३ मध्ये रायगड किल्ला जिंकून भगवा झेंडा फडकावला. त्यानंतर बाजीरावांच्या पराक्रमाने आणि शाहू महाराजांच्या धुरंधर खेळीने मराठा साम्राज्याचा संपूर्ण हिंदुस्थानात प्रचंड विस्तार झाला. या शंभू पुत्राने हिंदुस्थानावर जवळ जवळ तब्बल ४२ वर्षे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्य तख्तावर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका रोवली.

उत्कृष्ट योद्धा, धुरंदर शासनकर्ता, धिरोदत्त प्रशासक, उदार राज्यकर्ता, दयाळू राजा, क्षमाशील अंतःकरण, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या राजाने सर्वात जास्त वर्ष म्हणजे ४२ वर्षे हिंदुस्थानात राज्य केले परंतु हे पराक्रमी शाहू महाराज दुर्लक्षित राहिले हे दुर्दैव आहे. त्यांचे भग्नावस्थेत असलेल्या वाड्याच्या परीसरात नाही चिरा.. नाही पणती अशी वाईट अवस्था होती.

परंतु शिवभक्त आमदार भरत गोगावले यांनी शिवसैनिकांचे गाऱ्हाणे ऐकून तातडीने राज्य सरकारकडून ५० लाखांचा निधी आणून भूमीपूजनाचा सोहळा साजरा केला. त्यामुळे शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम शिवकालीन शिवालयाच्या काळ नदीवरील तीरावर शिवभक्तांना याची देही, याची डोळा पहावयास मिळाला.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये