
माणगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक ८ ऑक्टबर रोजी करमार स्कूल खोपोली येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत अशोक दादा साबळे विद्यालय व जुनियर कॉलेज माणगावच्या कुमार अर्णव पंकज खामगावकर ११ वी विज्ञान शाखेतील १९ वर्षे वयोगट कुस्ती फ्री स्टाईल ७५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत एकूण ६ कुस्तीपटू सहभागी झाले होते. अंतिम कुस्ती लढत ही महाड कॉलेजच्या कुस्तीपटू सोबत झाली त्यात अर्णव विजयी झाला असुन त्याची शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे वडील पंकज खामगावकर हे उत्तम खेळाडू म्हणून ओळखले जातात तर आजोबा लक्ष्मण धर्मा खामगावकर हे उत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध होते.
क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. रावळे, वाढवळ यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. या विजयी खेळाडूचे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा भाई गांधी, स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, नितीन बामगुडे, ॲड. घायाळ व डॉ. आबासाहेब पाटणकर तसेच अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगावचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी. एम. जाधव सर, उप मुख्याध्यापक तथा उपप्राचार्य दिलीप उभारे, उप प्राचार्य.श्री जमधाडे तसेच पर्यवेक्षक सोनावणे यांनी अभिनंदन करुन विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.