पळसगाव बुद्रुक व खर्डी खुर्द आदिवासी वाडी शाळेत अन्नदिन साजरा…!
अंकुर फांऊडेशनचा दरवर्षीप्रमाणेच स्तुत्य उपक्रम...!

प्रतिनिधी – महेश शेलार ( माणगांव ) दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक अन्न दिन हा उपक्रम सुरू केला. उपासमारी पिडीतांना मदत तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हा जागतिक अन्न दिनाचा उद्देश आहे. अंकुर फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणच्या आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अन्नदान केले जाते. यावर्षी माणगांव तालुक्यातील पळसगाव बुद्रुक व खर्डी खुर्द आदिवासी वाडी तसेच अंगणवाडी आणि येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांसमवेत अन्नदान दिनाचे औचित्य साधून बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्नदानाचा अतिशय स्तुत्य उपक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच अंकुर फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे सह-भोजनाचा आस्वाद देखील घेतला. विशेषतः अंकुर फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी व शिक्षकांनी शाळेच्या पटांगणात रूचकर स्वयंपाक करून विद्यार्थी व पालकांना भोजन दिले. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्मितहास्य दिसत होते. मनसोक्त भोजन करून मुले तृप्त झाल्याचे एक वेगळे समाधान या निमीत्ताने येथे उपस्थितांना अनुभवायास मिळाले. अन्नदान हेच श्रेष्ठ दान असते असा हा उपक्रम पार पडला. तत्पूर्वी शाळेतील शिक्षिका बागुल मॅडम, जाधव मॅडम, सह-शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, सेविका यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले.
कार्यक्रमा प्रसंगी अंकुर फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय चव्हाण, सचिव चिंतामणी बटवले, कार्याध्यक्ष अमित खैरे, उपाध्यक्ष प्रविण वारे, पत्रकार वैभव टेंबे, सदस्य सुनिल अंधेरे, रवी सुतार, कार्यवाह संतोष बटवले, राकेश पानसरे, संतोष कांबळे, भाई शिंदे उषस्थित होते. तसेच सदर उपक्रमासाठी लोणेरे येथील माहेर हाॅटेलचे हेमंत गडकरी व गोवा येथून रफिकभाई पठान यांची उपस्थिती विशेष ठरली. सदर पाहुण्यांनी अन्नदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत, स्वच्छता व हात धुण्याचे महत्व तसेच चांगले वाईट संस्कार विषयक माहीती दिली व या आदिवासी शाळेतील विद्यार्थी यांचा निटनेटकेपणा व शाळेतील सुंदर परिसर व स्वच्छते विषयी कौतुक केले. अंकुर फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय चव्हाण यांनी देखील संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जात असल्याचे सांगताना यावेळी सदर अन्नदान उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूरांकरीता सर्वांनी मनःपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिका बागुल मॅडम यांनी शाळेच्या व आदिवासीवाडीच्या वतीने उपस्थितांचे खुप आभार मानले. तसेच यावेळी ग्रामस्थ, महिला वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.