ग्रंथांचे वाटप करून समाजसेवक रविंद्र लाड यांनी राबवला धार्मिक उपक्रम.
प्रतिनिधी : संतोष उध्दरकर. (म्हसळा)

म्हसळा : श्रावण मासारंभ म्हणजे सणांची पर्वणी सुरु होते या पर्वणीच्या रेलचेलीत मोठ्या प्रमाणात धार्मिक उपक्रम राबविले जातात. खास करून श्रावण मासात गाव मंदीरात धर्म ग्रंथांचे वाचन होत असते,पारायण केले जाते. अशा प्रकारचा “श्रावण मासी हर्ष मानसी” उपक्रम म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती,श्री कृष्ण उन्नती संस्था तालुका अध्यक्ष,समाजसेवक व श्री रविप्रभा मित्र संस्था अध्यक्ष रविंद्र लाड यांनी म्हसळा तालुका गवळी समाजाचे १३ गावांत धर्म ग्रंथांचे वाटप करून केला आहे. या उपक्रमातून त्यांनी नव्या पिढी समोर आदर्श ठेवताना हिंदु देव देवतांची पुजा अर्चा, ग्रंथ वाचनातुन धर्म संस्कृती परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त केली आहे.
ईश्वराची ज्ञान धारणा केल्याने मानवाला सुख शांती लाभते आणि चांगले आचार विचार आंगीकारले जातात या स्तुत्य हेतुने समाजसेवक रविंद्र लाड यांनी गवळी समाज वस्तीचे नेवरुळ, घूम, जांभुळ, चंदनवाडी, गवळवाडी, सावर, वाडांबा, कोलवट, उकसीचा कोंड, चिखलप, सकलप आणि घोणसे निवाची, वडाची व म्हशाची वाडी गावांतील ग्रामस्थांना भगवत् गीता, विष्णू सहस्त्रनाम, गणपती सहस्त्र नाम, श्री कृष्णजन्माष्टमी ग्रंथ आणि भगवा ध्वज भेट देऊन धार्मिक उपक्रम राबविला आहे. त्यांचे या धार्मिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.