लाखात एक.. सायबांची लेक !
आदिती ताई तटकरेंना लाख मतांनी विजयी करणार; लाडक्या बहिणींनी केला निर्धार

प्रतिनिथी -अरुण पवार ( माणगांव ) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरला नसताना महायुतीच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांनी प्रचारालाही सुरुवात करुन त्यांनी शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज श्रीवर्धन येथे दाखल केला. लाखात एक, सायबांची लेक असा नारा लाडक्या बहिणींनी दिला असून आदिती ताईंना एक लाख मतांनी विजयी करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आज आदिती तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्या आपल्या एकीचं बळ महाविकास आघाडीतील नेत्यांना दाखवून देण्यासाठी एकवटल्या होत्या. प्रत्येक गावातून लाडक्या बहिणी शक्ती प्रदर्शन करुन आदिती तटकरे यांच्या लाखमोलाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार आहेत असा विश्वास रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी व्यक्त केला आहे.
लाडकी बहिण योजनेची पुर्तता आदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे मंजूर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ संकल्पात घोषणा केली होती. परंतु आदिती ताईंनी लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये तातडीने जमा केले. याची जाणीव असल्याने हजारोंच्या संख्येने बहिणी उपस्थित होत्या. हे पैसे आमच्या खात्यात जमा होत असल्याने आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला आधार मिळाला आहे. जे सुनील तटकरे सायबांना जमलं ते त्यांच्यापेक्षा अधिक लेक आदितीनं करुन दाखवलं आहे अशा भावना अनेक लाडक्या बहिणी व्यक्त करीत आहेत.
शाळेच्या दाखल्या मध्ये आणि इतर शासकीय दस्तऐवजांवर आता वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लागू करण्यात आल्याने मानसिक आणि सामाजिक आनंद वाटत आहे असे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कॉलेजच्या नवं मतदार असलेल्या तरुणींनी सांगितले. आदिती तटकरे यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत केल्याने आता माझ्या मुलीला डॉक्टर तर दुसऱ्या मुलीला इंजिनिअर करणार आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आल्याने वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लाडकी कन्या योजना सुरू झाल्याने मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाखांपेक्षा जास्त रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी मिळणार आहे. एसटी बस मध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. अशा विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने महिला वर्ग आदिती तटकरे यांच्यावर खुष आहेत असे दिसून येत आहे.