डॉ.कैलास डंगर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप
माझ्या वडीलांमुळेच मी घडलो - एसीपी स्वागत डंगर

प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण)
दादर गावचे सुपुत्र थोर समाजसेवक डॉक्टर कैलास डंगर यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय पेण येथे केक कापून फळ वाटप करण्यात आले. यावेळी स्वागत डंगर – एसीपी दिल्ली, एसटी कामगार नेते प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती नाशिकेत पाटील, सतीश जोशी, स्वाती डंगर, ऍड. जयदेव डंगर, संतोष ठाकूर, देवेंद्र म्हात्रे, सत्यवान पाटील, मोहन म्हात्रे यांच्यासह मित्रपरिवार व कटुंबीय उपस्थित होते.
डॉ. कैलास डंगर यांचे सुपुत्र स्वागत डंगर यांनी आपल्या अरुणाचल प्रदेश, गडचिरोली – महाराष्ट्र येथे कार्यरत असतानाचे अनुभव सांगितले. सध्या एसीपी म्हणून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत. पुढे सांगताना ते म्हणाले की, वडीलांनी केलेल्या संस्कारने मी ही मजल मारू शकलो. माझ्या वडिलांमुळेच मी घडलो. परिसरात नि:स्वार्थपणे सामाजिक सेवा केली. एक वर्षाची तयारी करायची असेल तर पिक पेरा, दहा वर्षाची तयारी करायची असेल तर फळ झाडे लावा, पण जर १०० वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं जोडा असा सल्ला वडीलांनी दिला होता. पेण तालुक्यात देवमाणूस म्हणून पप्पाची ओळख झाली. तुम्हा सर्वांचे प्रेम बघून त्याची प्रचिती पप्पा जाऊन अकरा वर्षे झाल्यानंतर ही येत आहे ही त्यांच्या कार्याची अनुभूती आहे.”
ऐतिहासिक वसा असणाऱ्या दादर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार होते. बेटासारख्या असणाऱ्या या गावात पूर्वी सुविधांचा वाणवा होता. त्यावेळी साथीचे रोग आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नसल्याने अडचण होत होती. अशावेळी दादर गावचे सुपुत्र डॉक्टर कैलास डंगर यांनी शहरात दवाखाना न टाकता गोरगरिबांची सेवा व्हावी व सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने दादर येथे दवाखाना सुरू केला. त्याबरोबरच समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टर कैलास डंगर यांचे दादर पूल होण्यासाठी, डॉक्टर कैलास डंगर पतसंस्था उभारण्यासाठी, दादर येथे माध्यमिक हायस्कूल होण्यासाठी व इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय पेण येथे फळ वाटप करताना वेगळे समाधान मिळत आहे. अशी भावना या वेळी प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.