वनविभागाच्या सहकार्याने माणगांव तालुक्यात खैर तस्करी
पन्हळघर, अंबर्ले, वडाची वाडी, कातळाचा कोंड येथे राजरोसपणे खैर जातीच्या झाडांची कत्तल

गोरेगांव – माणगांव तालुक्यात खैर तस्कर सक्रिय असल्याचे चित्र उघड झाले आहे. खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा कात आणि रसायन बुकटी बनविण्यात येत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडांची तोड करून तस्करी केली जात आहे.
तालुक्यातील अनेक गांवामधून अवैधपणे खैराची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वात जास्त प्रमाण पन्हळघर, अंबर्ले, वडाचा वाडी, कातळाची कोंड, वाघोसे, मांगरुळ विभागातून होत आहे. दिवसा तोड करण्यात येते तर रात्रीच्या वेळेस चोरटी वाहतुक केली जाते याबाबत अनेकदा तक्रारी वनपाल, वनक्षेत्रपाल यांच्याकडे झाल्या, पण तक्रारींकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे खैर तस्करांचे बळ अधिक वाढले आहे.
या सर्व प्रकाराला वनविभागाकडूनच सहकार्य मिळत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सागवान झाडांसोबतच अनेक किंमती झाडांची कत्तल देखील सुरूच आहे. मुख्यत्त: कात बनविण्यासाठी लागणाऱ्या खैराच्या अवैध तोडीने जंगल बोडके होत चालले आहे त्यामुळे जंगल तोडीला वनविभागातील अधिकारीच कारणीभूत असून त्यांचा वचक राहिला नाही. संबंधातून खैर चोरी अविरत सुरू असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.