गोविंदा आला रे… म्हसळ्यात बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा.
थरावर थर लावून गोविंदानी फोडली दहीहंडी...
प्रतिनिधी – संतोष उद्धरकर (म्हसळा) बोल बजरंग बली की जय…गोविंदा आला रे.. “ ढाकु माक्कुम .. ढाकु माक्कुम.. रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात व शहरात सर्वत्र दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहमय वातावरणात पार पडला तसेच दहीहंडी उत्सव हा अंत्यंत पारंपारिक पध्दतीने तसेच उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वरुणराजाने सुद्धा सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदामध्ये उत्साह संचारला होता. त्यामुळे सर्वत्र जल्लोष पहावयास मिळाला, शहरात यावर्षी देखिल बालगोपाळांनी दहीहंडीचा मनसोक्त आनंद लुटला.
शहरातील धाविरदेव महाराज व राधाकृष्ण मंदिरातील महत्वाची अशी मानाची हंडी ही परंपरेनुसार बांधण्यात येते व बांधण्यात आलेली दहीहंडी बाळगोपाळ मोठ्या आनंदाने फोडतात. गोविंदांनी साखळी पकडुन “ बोल बजरंग बली की जय“… गोविंदा आला रे… गोविंदा रे गोपाळा…खालु व सनईच्या तालावर सर्वच गोविंदा पथक ठेका धरतांना दिसत होते. शहरातील कुंभार समाज, गवळी समाज, शिंपीसमाज, तांबट व सोनार समाज या समाजांचा गोविंदा पथक शहरात ठिकठिकाणी जाऊन दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होते त्या त्या विभागातील ग्रामस्थ दहीहंडी पथकाचे स्वागत करून त्यांना चहा, अल्पोपहार देखील देण्यात येत होता. थरावर थर लावुन मनोरे उभे करून बाल गोविंदा दहिहंडी फोडताना दिसत होते तसेच
मुलींना देखील दहीहंडी फोडण्याचा मोह आवरला नाही त्या देखील तेवढ्याच उत्साहाने दहिहंडी फोडताना दिसल्या. एकंदरीत दहीहंडी हा उत्सव शहरात तसेच तालुक्यात कोणतेही गालबोट न लागता उत्साहात पार पडला.