पोलादपूर तालुक्यात दीड दिवसाच्या बाप्पाचे भावपुर्ण वातावरणात विसर्जन
प्रतिनिधी - देवेंद्र दरेकर (पोलादपुर )

पोलादपूर – पोलादपुर तालुक्यात यावर्षी १८१० गणेश मुर्तींची शनिवार दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेशचतुर्थी च्या मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली असून यापैकी ७ सार्वजनिक गणपतींचे आगमन मोठया उत्साहात करण्यात आले. गणपती आगमन सोहळ्याकरिता पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले होते.
गणपती बाप्पा मोरया….आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं. सर्वांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तितक्याच भावनात्मकरित्या आपल्या लाडक्या बाप्पा ला निरोप दिला जातो. असाच निरोप पोलादपुर तालुक्यातील अनेक गावागांवात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपुर्ण वातावरणात देण्यात आला.
तालुक्यातील या १८१० गणपतींपैकी आज रविवारी सायंकाळी ५ नंतर दीड दिवसांच्या ३७६ घरगुती व १ सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ढवली, कामथी, घोडवली, उत्तर वाहिनी सावित्री नदीपात्रात भक्तिमय वातावरणात करण्यात आले.