Join WhatsApp Group
मनोरंजन

९ ऑक्टोबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माणगावात

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी आधीच भाऊबीज भेट; बहिणींची उत्सुकता, जोरदार तयारी सुरू

प्रतिनिधी – अरुण पवार  ( माणगांव ) माणगाव येथील मोर्बा रोड लगत धनसे मैदानावर रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता हा कार्यक्रम त्याच भव्य मैदानात लाडक्या बहिण योजनेचा महाराष्ट्रातील तिसरा कार्यक्रम बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत शेठ गोगावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दसऱ्या अगोदरच दिवाळीची भाऊबीज भेट या निमित्ताने मिळणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. हि तयारी प्रत्यक्षात सुरू झाल्याने लाडक्या बहिणींना उत्सुकता लागून राहिली आहे.

       लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर दुपारी १२ वा. होणार आहे. याची अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री ना. आदिती तटकरे यांनी सविस्तर दिली. यापूर्वी या योजनेचे दोन हप्त्यांत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना १५०० प्रमाणे थेट ३००० रुपये जमा झाले आहेत. तिसऱ्या हप्त्याच्या पैशांचे वितरण आधीच्या हप्त्यांप्रमाणे थेट जमा होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी त्यावेळी करण्यात येणार आहे.

यावेळी सप्टेंबर महिन्यापर्यंत आलेल्या पात्र अर्जांचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या अर्जांत अपुर्णता आणि त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. अशा लाभ न मिळालेल्या लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. या तिसऱ्या हप्त्यांत एकूण २ कोटी महिलांना पैशांचे वाटप थेट त्यांच्या खात्यात त्यावेळी होणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची छाननी करून त्रुटी नसलेल्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३००० रुपये यापुर्वीच जमा झाले आहेत. पुणे येथे या योजनेचा रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता. त्यामुळे ऑगष्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा झाले होते. त्यानंतर नागपूर येथील दुसऱ्या कार्यक्रमात दुसऱ्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले होते. आता बुधवार ९ ऑक्टोबर रोजी तिसरा हप्ता देऊन लाडक्या बहिणींना दसऱ्या अगोदर दिवाळीची भाऊबीज देऊन खुष करण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला आणि बालकल्याण राज्य विभाग मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत. हा कार्यक्रम ना. अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील माणगाव या मध्यवर्ती ठिकाणी होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना आपली राजकीय ताकद, आपल्या पक्षाचे वर्चस्व आणि महायुतीची एकजूट दाखवण्याची आयती संधी उपलब्ध झाली आहे असे मानण्यात येते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेषतः ना. आदिती तटकरे मतदार संघातील प्रत्येक प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून आहेत. या कार्यक्रमाला येण्यासाठी गावोगावी सभा आणि बैठका घेतल्या जात आहेत. तसेच आरोग्य विभाग, महिला विभाग, शिक्षण विभाग यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामाला लावले आहे. जेणेकरून लाडकी बहिण योजनेपासून कोणीही महिला वंचित राहू नये याची काळजी आणि खबरदारी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी मुलींना सायकली, शिलाई मशीन, ज्यूस मशीन वाटप आणि इतर संबंधित साहित्य वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला स्वताच्या पायावर उभ्या राहून व्यवसाय करु शकणार आहेत.

या कार्यक्रमासाठी भव्य सभामंडप उभारण्यात येत आहे. त्यांची पाहणी प्रमुख नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते विशेष प्रयत्न करीत आहेत. पोलीसांचाही मोठा फौजफाटा येणार असून कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे असे पोलिस सुत्रांनी सांगितले. या कार्यक्रमाची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या योजनेची चर्चा घराघरात होत असल्याने या बहिणी आपल्या लाडक्या भावांचे सरकार आणण्यात यशस्वी होतील का ? याकडे मतदारसंघाचं लक्ष लागून राहिले आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये