“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” तळा शहरात रॅली
मतदान आपला हक्क, तळा ज्युनियर कॉलेजच्या वतीने मतदान जनजागृती रॅली.

,
प्रतिनिधी – किशोर पितळे ( तळा ) जगातील भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मतदानासंदर्भात घसरणारा टक्का पाहता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थिती पाहता मतदानाचा हक्क बजावण्यात येत नाही. टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी टक्केवारी यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही रॅली तळा ज्युनियर कॉलेज, मुळे हॉटेल, कासार आळी, नगरपंचायत, बाजारपेठ ते कॉलेज अशी काढण्यात आली होती.
दरम्यान विद्यार्थ्यांनी आपले मत आपले भविष्य, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान आपला हक्क, आहे वोट देने जाना है… देश को आगे बढाना है… अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली. रॅलीमधील विद्यार्थी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.सदर रॅलीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप ढाकणे, सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.