
उरण – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीला (दसरा) शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी उरण शहरात पथ संचलन काढण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने उरण शहरातील रस्त्यांवर हाती लाठी घेऊन काढण्यात आलेल्या या पथ संचलनात समाजातील सर्वच घटक, विविध मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी ३६ गणवेशधारी स्वयंसेवक, १८ इतर मान्यवर या पथ संचलनात सहभागी झाले होते.
२७ सप्टेंबर १९२५ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांनी शारीरिक, बौद्धिक आणि सर्व दृष्टींनी आपल्या ध्येयाला साध्य करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने संघाची स्थापना केली. गेल्या ९९ वर्षांनंतर संघामध्ये बरीच उलथापालथ झाली असून संघाची ध्येय धोरणेही बदलली. मात्र, संघ स्वयंसेवकातील राष्ट्राभिमान आणि कडवटपणा कायम आहे. २०२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी संघ शतक महोत्सव मोठया उत्साहात साजरी करणार आहे. संघाच्या स्थापनेनिमित्त उरण शहर मध्ये विविध भागात संघ स्वयंसेवकांनी शनिवारी दसऱ्यानिमित्त केलेले संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. उरण शहरातील गणपती चौकातील श्रीराम मंदिरात दसऱ्या निमित्त संघाच्या परंपरा व प्रथेनुसार विधिवत शस्त्र पूजन करण्यात आले.