“चित्रलेखा पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे आवाहन
प्रतिनिधी - ओमकार नागांवकर ( अलिबाग )

अलिबाग : महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढणार आहेत ही स्पष्ट भूमिका आहे. महाविकास आघाडीमध्ये आज उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व, चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. शिवसैनिकांच्या या भावना आहेत, जनतेच्या भावना आहेत की, आगामी काळात विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असावेत. ज्या पद्धतीने गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिसकावली, त्यामुळे गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची भावना आहे, असे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दि. ६ नोव्हेंबर रोजी अलिबाग हॉटेल बिग स्पल्याश येथे बैठक झाली. बैठकीत जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, युवासेना जिल्हाअधिकारी अमीर ठाकूर, कैलास गजने, प्रमोद भायदे, अलिबाग तालुका संघटक हेमंत पाटील, अलिबाग तालुका संपर्क प्रमुख उपकार खोत, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ. दर्शना पाटील, जिल्हा सहसंपर्क संघटिका सौ. शिल्पा घरत, शहर संघटिका सौ. राखी खरवले व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या सन्मानार्थ सर्व शिवसैनिकांना आदेश दिले आहेत की महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. चित्रलेखा पाटील यांना बहुमतांनी विजयी करायचं आहे. मातोश्रीवरून आलेला आदेश आमच्यासाठी अंतिम आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवस आमचा प्रत्येक शिवसैनिक तुमच्यासोबत अगदी तन-मन-धन अर्पण करून काम करेल. हीच महाविकास आघाडी येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि सर्व निवडणुका मध्ये सोबत असेल तर गद्दार व महायुती टिकुच शकणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की शिवसैनिक १००% मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच करेल असे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.