पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेस फाउंडेशन, यु मुम्बाचे एक पाऊल पुढे
वृक्ष लागवडीनंतर आता सौर दिव्यांनी उजळणार ग्रामीण भागातील घरे

प्रतिनिधी – राम भोस्तेकर ( लोणेरे ) पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेस फाउंडेशन आणि यु मुम्बा यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भारताला सशक्त करण्यासाठी वृक्ष लागवडीपासून सुरू झालेला प्रवास यंदा सौरदिव्यापर्यंत पोहचला आहे. स्वदेस सुपर सोलार पॉवर या संकल्पनेनुसार आता ग्रामीण भागातील अनेक घरे सौर दिव्यांनी उजळणार आहेत.
स्वदेस फाउंडेशन आणि यु मुम्बा यांनी गेल्या वर्षी भारताला सशक्त बनवण्यासाठी एकत्रित मोहीम सुरू केली होती. यामध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३०० फळझाडांचे वितरण करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण समुदायांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे.
यावर्षी प्रो कबड्डी लीगमध्ये स्वदेस फाउंडेशन आणि यु मुम्बा यांनी ही भागीदारी अधिक विस्तारित करून ग्रामीण भागातील घरांना सौरदिव्यांनी उजळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गावकऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरेल. याचाच एक भाग म्हणून ‘स्वदेस सुपर सोलार पॉवर ‘ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये यु मुम्बा संघाद्वारे मिळवलेले प्रत्येक गुण रायगड आणि नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील १० घरांना सौर दिवे ( एक सुपर रेड ) आणि १५ घरांना सौरदिवे ( एक सुपर टॅकल ) मिळवून देतील. यामुळे शेकडो कुटुंबांना सौर ऊर्जा दिवे मिळतील आणि प्रत्येक घर प्रकाशमय होईल.
यु मुम्बा आणि स्वदेस फाउंडेशन प्रो-कबड्डीमधील सामन्यांमधून ग्रामीण परिवर्तनासाठी एक पाऊल पुढे नेण्याचे कार्य करत आहे. यु मुम्बा संघाचे मालक आणि स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, यु मुम्बा संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल चांडोक, स्वदेस फाउंडेशनच्या संस्थपिका झरीना स्क्रूवाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी यु मुम्बा संघाला जास्तीत जास्त सुपर टॅकल आणि सुपर रेडसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमातून जास्तीत जास्त घरे सौर ऊर्जाने उजळतील.