माणगावातील कचरा डेपोला आग ; सर्वत्र विषारी धुराचे साम्राज्य
धुरांमुळे आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसह नागरीकांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव शहरातील आदिवासी आश्रम शाळेजवळील कचरा डेपोला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने त्या भागात सर्वत्र विषारी धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसह नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. या डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा जळलेल्या अवस्थेत असल्याने बाहेर पडणारा धूर आरोग्यास धोकादायक आणि हानिकारक ठरत आहे.
या कचरा डेपोला लागलेली आग पसरलेली समजताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचे फवारे मारुन सदर पसरलेली आग विझविली मात्र अद्यापही धुर थांबलेला नाही. या धुरामुळे माणगाव शहरातील प्रदुषणाची पातळी वाढली असल्याचे दिसून येत आहे. कचरा डेपोतील कचरा जाळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्दी, ताप खोकला होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहेत. हा विषारी धुर थेट फुफ्फुसात गेल्यावर श्वास कोंडण्याचे प्रकार घडत आहेत. डोळे लाल होतात आणि झोंबतात. पोटात मळमळते. काहींना अस्वस्थ वाटू लागते. कचरा डेपो जवळील आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि आजूबाजूच्या नागरीकांना या धुळ आणि धूर यांचा नाहक त्रास होत आहे तसेच काही डॉक्टर तंज्ञाच्या म्हणण्यानुसार या धुर आणि धुळकणांमुळे विद्यार्थी तसेच आजुबाजूच्या नागरीकांना कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागु शकते.
याबाबत नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन नियंत्रण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कचऱ्र्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच कचऱ्र्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल