शिपुरकर आणि वाघरे शाळेचा अभिनव उपक्रम ; वाढदिवसाला विद्यार्थी देतात शाळेला पुस्तके भेट
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगांव – माणगांव येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेला विविध पुस्तके भेट देऊन आपला वाढदिवस साजरा करतात. या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.
अनेक पालक आपल्या मुला – मुलीचा वाढदिवस शाळेत चॉकलेट वाटून, घरी किंवा हॉटेलमध्ये जाऊन अवाजवी आणि वायफळ खर्च करतात मात्र हा अनाठायी खर्च भविष्यात सत्कारणी लागत नाही असे दिसून येत आहे. हा खर्च खऱ्या अर्थाने सत्कारणी लागण्या करीता या शाळेतील स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट न देता कोणतेही जूने किंवा नवीन पुस्तक, कथा, कांदबरी, ग्रंथ, अंक, कथासंग्रह, बालसाहित्य, इतर वाचनात आलेली पुस्तके भेट म्हणून द्यावीत असे आवाहन चेअरमन अरुण पवार आणि मुख्याध्यापिका मनिषा मोरे यांनी केले होते त्यास पालक आणि विद्यार्थी यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने विद्यार्थी संस्कारक्षम आणि स्वयंपूर्ण होतो. वाचनाने जीवनात अमुलाग्र बदल घडून येतात. आताच्या पिढीतील मुलांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तके ठेवली तरच त्यांचं जनरल नॉलेज वाढू शकते. या अभिनव उपक्रमामुळे शाळेचे ग्रंथालयात पुस्तकांची अधिकची भर पडत असून ते समृद्ध होत आहे. ज्ञान दिल्याने वाढते या प्रमाणे शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना ही पुस्तके प्रेरणादायी ठरत आहेत यांचा आनंद मुक्तहस्ते विद्यार्थी घेत आहेत.
या शाळेतील सई डवले, माही डवले, देवांग आहीरे, अनन्या तायडे, आर्या फाटक आदी विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्तके भेट देऊन ग्रंथसंपदा आणि ग्रंथसंग्रह वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल चेअरमन अरुण पवार यांनी आभार मानले आहेत. तसेच शहरातील नागरिकांनी विविध प्रकारची पुस्तके देऊन सहकार्य आणि सत्कार्य करावे असे आवाहन अरुण पवार यांनी केले आहे.