तालुक्याच्या ठिकाणावरील एकमेव सैनिक विश्रामगृह मोजतोय शेवटची घटका ; सैनिक विश्राम गृह की भूत बंगला
देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या तमाम सैनिकांची अवहेलना,

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले, छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलल्या, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यांची तमा न बाळगता शहीद झाले, देशासाठी हुतात्मा झाले त्या आजी आणि माजी सैनिकांच्या माणगाव येथील सैनिक विश्राम गृहाची अत्यंत दुर्दशा आणि दयनीय अवस्था झाली असून सैनिकांसाठी आधार देणारे विश्राम गृह आता भूत बंगला बनला असल्याचे म्हटले जात आहे.
युद्ध प्रसंगी जसे शत्रु घेरतात तसेच या विश्राम गृहाला झाडा झुडपांनी घेरुन विळखा घातला आहे. त्यामुळे पडझड झाली आहे. सर्वत्र दाट गवत आणि वेलींचे साम्राज्य पसरले आहे. दरवाजे, खिडक्या, तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. छप्पर उडालेले आहे. कौले उडून फुटलेली आहेत. संपूर्ण इमारत मोडकळीस आलेली आहे. लोखंडी प्रवेशद्वार गंजून मोडकळीस आले आहे. संरक्षक भिंतींचीही नासधूस झाली आहे. त्यामुळे या विश्रामगृहाला अखेरची घरघर लागली आहे. शासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सैनिककांची अवहेलना सुरू ठेवली आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी जे सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करता लढतात त्याच सैनिकांच्या विश्रामगृहाचे रक्षण करण्याचे काम शासनाला का करता येत नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाच वर्षांपूर्वी या विश्राम गृहाची तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. तत्कालीन मंत्र्यांनी अनेक वेळा हे विश्राम गृह बांधण्यासाठी प्रयत्न केला आणि निधीही उपलब्ध करून दिला होता. परंतु अद्यापही या विश्राम गृहाला विळखा घालणारे एकही पान हललेले नाही. नाही चिरा, नाही पणती अशी भयंकर आणि भयाण दुरवस्था झाली आहे. शासनाने हे विश्राम गृह बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही. त्यामुळे सैनिकांची भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे. कुणी घर देता का घर या प्रमाणे सैनिक निराधार आणि ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे.