
माणगाव – माणगाव येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिपुरकर आणि शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्नेहसंमेलनात लहान विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मक पद्धतीने कलाविष्कार सादर केले. त्यांच्या नटखट अदाकारीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच महाराष्ट्राची पारंपरिक नृत्यकला अफलातून सादर करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती मधील पंजाबी, गुजराती, गोमंतक, तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी आदी पारंपरिक नृत्ये सादर केली. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील जागर, गोंधळ, शेतकरी, धनगरी, आदिवासी, कोकणी नृत्ये केली. तसेच नाटक आणि गाणी गायली. नाटकातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना विविध प्रकारचे सामाजिक संदेश दिले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, पूणे येथील उद्योजक संतोष चिल्लार, वैज्ञानिक प्रमोद राव, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या चेअरमन निकिता जैन, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, संचालक नितीन बामगुडे, ॲड. विनोद घायाळ, डॉ. आबासाहेब पाटणकर, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, निशिगंधा मयेकर, धनाजी जाधव, दिलीप, उभारे नगरसेवक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.