जे एन पी ए मार्फत करंजखोल येथे बांधलेले शाळा वर्गखोलीचे शानदार सोहळ्यात हस्तांतरण
महाड प्रतिनिधी

महाड – जवाहर लाल नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजेच जे एन पी ए न्हावा शेवा, नवी मुंबई यांचे सी एस आर निधीतून साथी संस्था दिल्ली यांचे सहयोगाने महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजखोल येथे दोन वर्ग खोल्या आणि एक बहुद्देशीय सभागृह बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
जवाहर लाल नेहरू बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे आणि व्यस्त असे बंदर असून देशाचे ढोबळ आर्थिक उत्पन्नात मोठे योगदान देत असते. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनी मार्फत दरवर्षी शिक्षण , आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या विषयात मूलभूत काम केले जाते. महाड तालुक्यात २०२१ मध्ये आलेले महापूर आणि भुस्खलनाचे पार्श्वभूमीवर दरडप्रवण क्षेत्रातील करंजखोल गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजखोल येथे तीन खोली शाळा इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव सस्टनेबल एश्यन टूवर्ड ह्यूमन इम्पोर्मेंट अँड एज्युकेशन (साथी) संस्था, नवी दिल्ली यांचे मार्फत जे एन पी ए कडे सादर करण्यात आला होता. त्यास या आर्थिक वर्षात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार साथी संस्थे मार्फत शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मागणी नुसार रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजखोल येथे मूळ इमारतीचे स्लॅबवर मूळ इमारतीचे आराखड्यात नुसार २ वर्गखोल्या आणि एक बहुद्देशीय सभागृह असे पक्के आरसीसी बांधकाम केले आहे. सदर दोन वर्ग खोल्या आणि एक बहुद्देशीय सभागृह यांचा हस्तांतरण सोहळा मंगळवार दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. जवाहर लाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई चे जनरल मॅनेजर श्रीमती मनीषा जाधव यांचे शुभहस्ते शाळा व्यवस्थापन समितीकडे चाव्या सुपूर्त करण्यात आल्या.
सदर सोहळ्यासाठी श्री सिद्धार्थ उघाडे, सी एस आर कन्सल्टंट जे एन पी ए, श्रीम. ज्योति कुमारी श्रीवास्तव मॅडम , चेअरमन साथी संस्था नवी दिल्ली, श्री सौरभ कुमार संचालक, साथी, संस्था श्री राजन सुर्वे, गट शिक्षाधिकारी महाड , श्रीमती स्नेहा विरकर केंद्र प्रमुख करंजखोल यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत शालेय विद्यार्थी यांचे लेझिम नुत्याने करण्यात आले. त्यानंतर श्रीमती मनीषा जाधव यांचे शुभहस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. देवी सरस्वती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत सत्कार आणि शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय सैन्यदलातील अग्निविर सिद्धेश शिगवण यांना भव्य सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक पूजा शहा यांनी प्रास्ताविक केले. शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी पारंपारिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विषय शिक्षक स्नेहल खातू यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन केले, कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मागील वर्षभरात राबविलेले जीवन शिक्षण उपक्रमांचे सादरीकरण तंत्रस्नेही शिक्षक श्री स्वप्नील बनसोडे यांनी केले. त्याचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक पूजा शहा, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन केले. पालक आणि माझी विद्यार्थी यांचे उदंड प्रतिसादात कार्यक्रम संपन्न झाला .