महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर
श्रीवर्धन विधानसभा संघातून फैझलभाई पोपेरे लढणार निवडणुक

प्रतिनिधी – ( गोरेगांव ) १५ व्या महाराष्ट्र विधान सभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील सर्व राजकीय नेत्यांसोबत जनतेचे लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल. सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आपले उमेदवार या विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यास सज्ज आहे.
विधान सभा निवडणुकीचे पडघम वाजले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाचवी यादी जाहीर झाली आहे. .या .यादीमध्ये १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. फैझल पोपेरे यांचे नांव महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मनसे कडून फैझल पोपेरे हे पहिले अल्पसंख्याक विधानसभा उमेदवार आहेत. या आधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून जनता पार्टीचे अब्दुल शकुर उकये तसेच कॉंग्रेसकडून बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांची अल्पसंख्याक आमदार म्हणून ओळख होती, या दोनही आमदारांप्रमाणे अल्पसंख्याक आमदार म्हणून फैझल पोपेरे यांना निवडुण येण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून फैझल पोपेर यांचे नांव जाहीर झाल्याने श्रीवर्धन मतदार संघात आनंदाचे वातावरण तयार झाले असून रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. सोबतच जिल्हाध्यक्ष श्री. सुबोधजी जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्याची संथी मिळाल्याने फैझल पोपेरे यांनी आभार मानले असून अल्पसंख्याक आमदार म्हणून निवडुण येणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.