बळीराज सेनेकडून श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीसाठी कृष्णा कोबनाक यांचा अर्ज दाखल.
ओबीसी मतांचा बळीराज सेनेला होणार फायदा

गोरेगांव – रायगड जिल्हयात जास्त ओबीसी समाज असल्याने याचा फायदा घेण्यासाठी बळीराजा सेना पक्ष सध्या आगेकूच करताना दिसतंय, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात देखील असंच काही चित्र पहायला मिळत आहे. या साठी बळीराज सेनेकडून आज विधानसभा निवडणुकीचा अर्ज महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी दाखल केला आहे.
ओबीसी समाजाला १९९० सालापासून विधानसभा आणि लोकसभेवर नेहमीचं डावलण्यात आले आहे. रायगड जिल्हयात ओबीसी समाज जास्त संख्येनी असल्याने बळीराज सेना पक्षाने सुरुवाती पासूनच कुणबी जोडो अभियान सुरू ठेवलंय. मात्र त्याचा फारसा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर झालेला दिसला नसला तरी या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होईल अशी चिन्ह मात्र दिसत आहेत. जिल्हयात ६० टक्के ओबीसी समाज आहे आणि एकट्या श्रीवर्धन मतदार संघात ७० टक्के ओबीसी मतदान आहे त्यामुळे ओबीसी मतांचा विचार करता बळीराज सेनाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून ओबीसी समाजाचे नेतृत्व विधानसभा निवडणुकीत करण्याची मोठी संधी यावेळी बळीराज सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कृष्णा पांडुरंग कोबनाक यांना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस राहिल्याने आज दि. २८ ऑक्टोबर रोजी शेक़डो कार्यकर्त्याना सोबत घेत ढोल ताशांच्या गजरात श्रीवर्धन येथील सोमजाई देवीच्या मंदिरात सोमजाई आईचे दर्शन घेऊन श्रीवर्धन उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयात कृष्णा कोबनाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.