खारपाले गावातील जलजीवन मिशन योजनेतील निकृष्ट कामाच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी - दिपक लोके ( पेण )

पेण : ग्रुप ग्रामपंचायत खारपाले हद्दीमधील मौजे खारपाले या गावाकरीता सन २०२१-२२ या वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रूपये १,३४,१०,१४७/- इतकी आहे. सदरचे काम हे अंदाजपत्रक प्लॅन इस्टीमेंटप्रमाणे झाले नसल्याचा आरोप खारपाले ग्रामस्थांनी केला असून या कामाची चौकशी करण्याची मागणी लेखी तक्रार अर्जाद्वारे मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत खारपाले हद्दीमधील मौजे खारपाले या गावाकरीता सन २०२१-२२ या वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. अंदाजपत्रक प्लॅन एस्टीमेंटप्रमाणे करण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता मर्जीप्रमाणे करताना वरचेवर खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गावातील बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याचे या अर्जात म्हटले आहे. पाईपलाईन खोदकाम एस्टीमेंटप्रमाणे ३ फूट खोल व २.५ फूट रुंद असतांना खोदकाम फक्त ६ इंच करून त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याबाबीकडे शाखा अभियंता, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पेण, सरपंच, उपसरपंच यांनी दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातले असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी खारपाले ग्रामस्थांनी केली आहे.