विद्यार्थ्यांनी वाचनाचा मूल्यसंस्कार जोपासला पाहीजे. – डाॅ.भाऊसाहेब नन्नावरे.
वाचन, मनन, चिंतन, व्यायाम या चार संस्कारातून विद्यार्थ्यांनी स्वविकास साधावा.

प्रतिनिधी – किशोर पितळे ( तळा ) भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्या निमित्ताने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे मराठी विभाग व ग्रंथालयाच्या सहकार्याने आयोजन केले होते. यावेळी आभासी पद्धतीने झालेल्या या विशेष व्याख्यान सत्रात प्रमुख वक्ते डॉ. भाऊ साहेब नन्नावरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भाऊसाहेब नन्नावरे म्हणाले कि व्यक्तिच्या सर्वांगीण जडणघडणीत वाचनही गरजेची गोष्ट आहे. महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी वाचनाचा मूल्य संस्कार घेत विविध स्वरूपाचे वाचन केले पाहिजे. नवा विचार, दृष्टिकोन, ज्ञान – माहिती व आत्मविश्वास वाचनातून आपल्याला मिळतो आणि जीवनाची दिशा सापडते, असे मौलिक विचार के. एम. सी. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब नन्नावरे यांनी व्यक्त केले. आभासी पद्धतीने झालेल्या या विशेष व्याख्यान सत्रात डॉ.नन्नावरे यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करून युवकांचे प्रेरणास्थान म्हणून डॉ. कलाम यांनी केलेल्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. सामान्य परिस्थितीतून असामान्य कर्तृत्व केलेले डॉ. कलाम हे खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्थान आहेत.
भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न डॉ. कलाम यांनी पाहिले ते सत्यात उतरवण्यासाठी युवकांनी स्वविकासातून राष्ट्र विकासातबहुमोल योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.वाचनाचे आजचे महत्व सांगत शासन स्तरावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी होत असलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती त्यांनी दिली. याउपक्रमांना प्रत्येक व्यक्तीने प्रतिसाद देण्याची गरज आहे. वाचनाची प्रेरणा घेऊन नव्या पिढीने स्वतःला समृद्ध व संपन्नपणे घडवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाचन संस्कारात पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहेच पण त्याबरोबरच वाचनासाठी उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांचा स्वीकार करीत मन, बुद्धी आणि भावनेचा विकास वाचनातून साधता येतो. वाचनासाठी इच्छाशक्ती हवी.
पुस्तकांच्या सहवासात समृद्ध असा वाचनानुभव आपल्याला मिळतो असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.नानासाहेब यादव यांनी वाचन, मनन, चिंतन आणि व्यायाम या चार संस्कारातून विद्यार्थ्यांनी स्वविकास साधावा. संस्कार देणारी ही साधने आधुनिक काळात बाजूला जात आहेत. त्यातून नवे प्रश्न आणि आव्हाने निर्माण होताना दिसतात. म्हणून पुन्हा एकदा ही वाचन प्रेरणा व हा मूल्यसंस्कार आपण स्वतःमध्ये रुजवला पाहिजे. त्यातूनच उज्वल असे भविष्य आपल्याला घडवता येईल असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथपाल मनोज वाढवळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोनम पवार मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. थोरात सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक – प्राध्यापिका व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.