शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या संकल्पनेतून विविध प्रकारचे कलात्मक रंगीबेरंगी आणि आकर्षक पेन स्टँड
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगांव – माणगाव येथील शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून विविध प्रकारचे कलात्मक रंगीबेरंगी आणि आकर्षक पेन स्टँड वर्गात शिक्षकाच्या समक्ष तयार केले.
इवल्याश्या चिमुकल्या हातांनी बनवलेले पेन, पेन्सिल आणि इतर छोटे – मोठे शैक्षणिक साहित्य स्टँड शिक्षकांना भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव आणि संधी मिळावी. बुद्धीमत्तेला चालना मिळावी. त्यांच्यामधून नवनवीन कलाकृती आणि कलाकार घडावेत. त्यांनी शिक्षणाच्या कक्षा ओलांडून गरुड झेप घ्यावी. त्यांच्या छोट्याशा पंखांना बळ मिळावे. त्यांना सतत प्रोत्साहन देण्यासाठी अशा विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
त्यामुळे विद्यार्थी आनंदी, हुशार, कृतिशील, विचारवंत, उपक्रमशील आणि उद्यमशील बनतात. याचा विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्याप्रकारे शैक्षणिक लाभ होतो. तसेच विद्यार्थी अष्टपैलू बनतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वृद्धिंगत होतो. विशेषतः विद्यार्थी स्मार्ट आणि अक्टिव बनतात असे मुख्याध्यापिका मनिषा मोरे यांनी सांगितले.