गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानची महाराष्ट्र राज्य मंत्रालयाच्या मराठी भाषा विभागाकडून “मराठी भाषा युवक मंडळ” म्हणून निवड..
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर. ( म्हसळा)

म्हसळा – मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेर मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने जाहीर केला. याबाबतचा अध्यादेश सरकारने नुकताच प्रसिद्ध केला आहे. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५०० मंडळे स्थापन करणार आहेत. मराठी भाषेचा प्रसार – प्रचार करण्यासाठी राज्य शासनाचा जेव्हा निर्णय घेण्यात आला ह्यासाठी महाराष्ट्रातील तथा महाराष्ट्राबाहेरील परंतु देशांतर्गत मराठी युवक मंडळे नोंदणीकृत असावीत तसेच ती मंडळे मराठी भाषा संवर्धनासाठी, मराठी अस्मितेसाठी कार्यरत असावी.
मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे याबाबतचा मराठी भाषा विभागामार्फंत दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासननिर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून मान्यताप्राप्त मराठी भाषा युवक मंडळांतून झालेल्या प्रत्येक पात्र मंडळाला मराठी भाषा विषयक इतर कार्यक्रम आयोजित मुभा देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत सन २०२४-२५ हि निवड करण्यात आली आहे. मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे, हे या मंडळांचे मुख्य उद्दिष्ट आहे, त्यांची व्याप्ती महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पण देशांतर्गत असणार आहे. ही मंडळे नोंदणीकृत असावीत. मराठीचा प्रचार आणि प्रसार हे युवक मंडळाचे ध्येय असले, तरी मंडळामध्ये अमराठी भाषकांचाही समावेश करता येणार आहे. त्यांची नोंदणी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने करावी असाही निष्कर्ष काढण्यात आला होता. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा तर्फे (रायगड) गेली ११ वर्षे मराठी राजभाषा दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रतिष्ठानचे नेहमी प्रयत्न असतात.
गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवपालखी सोहळा आयोजित करण्यात येतो तसेच दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरून शिवज्योत आणली जाते, तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा, किल्ले स्पर्धा, सार्वजनिक पुरूष व महिला दहीहंडी उत्सव, दुर्ग अभ्यासवर्ग आयोजन, नामवंत साहित्यिकांचा तसेच इतिहास अभ्यासकांचा सहभाग असलेली व्याख्याने आयोजित करणे, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि देवनागरी लिपीच्या जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे, वार्षिक बक्षिस वितरण सोहळा, मराठी राजभाषा दिन असे अनेक सामाजिक समरसता जपणारे उपक्रम राबविले जातात.
गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानची हि राज्य शासकीय निवड म्हसळा तालुक्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याने गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे खुप कौतुक केले जात आहे तसेच पुढील काळात मराठी भाषाविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष श्री सचिन करडे यांनी माहीती दिली.