Join WhatsApp Group
महाराष्ट्र

मुंबई ते गोवा नवा सुपरफास्ट पर्यायी महामार्ग; ९० पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग

महामार्गाची लांबी ५०० कि. मी. तर महामार्गासाठी होणार २६ हजार कोटींचा खर्च

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव  ) भविष्यात मुंबई ते गोवा महामार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने नवा मुंबई ते गोवा सुपरफास्ट महामार्ग करण्याचे ठरवले आहे. कोकणच्या ७२० किलोमीटर समुद्र किनाऱ्याजवळून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. त्यासाठी तब्बल २६ हजार कोटी रुपये खर्च येणार हा महामार्ग ५०० किमी लांबीचा असणार आहे. त्यामध्ये ९० पर्यटन स्थळांना हा महामार्ग जोडणारा एकमेव दुवा असणार आहे. यासाठी ७ नवे पुल बांधण्यात येणार असून त्यांची लांबी तब्बल २७ किलोमीटर इतकी असणार आहे. हा सुपरफास्ट महामार्ग कॅलिफोर्निया येथील पॅसिफिक महामार्गासारखा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणचा खर्या अर्थाने कॅलिफोर्निया होण्याचे जे स्वप्न कोकणी माणसांनी पाहिले होते ते भविष्यात सत्यात उतरणार आहे.

सध्या सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. हा महामार्ग कधी कधी पुर्ण होईल ते कुणालाच सांगता येणार नाही. नवी मुंबई पनवेल पर्यंत आलेली आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या आराखड्यात रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग, पेण, कर्जत आणि खोपोली या पाच तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतूक आणि दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच नागरीकरण झपाट्याने वाढत जाणार आहे. दिघी बंदर सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूकीवर प्रचंड प्रमाणात ताण येणार आहे. ही समस्या लक्षात घेऊन कोकणातील लोकांना आणि पर्यटकांना प्रवास सुखकर आणि निर्विघ्न होण्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि पर्यटन यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पावर पाच वर्षे काम सुरू होते.

गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे विस्तारण्यात आले आहे. हजारो किलोमीटर चे नवीन महामार्ग विकसित झाले आहेत. गत दहा वर्षाच्या काळात जेव्हापासून देशात मोदी सरकार आले आहे तेव्हापासून देशात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र महाराष्ट्रात असे काही महामार्ग प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही रखडलेली आहेत. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प हा देखील असाच एक प्रकल्पातून याचे काम तब्बल १२ वर्षा पासून सुरु आहे. अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र भविष्यात मुंबई ते गोवा हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. कारण एक नवा महामार्ग विकसित केला जाणार आहे. २६ हजार कोटी रुपये खर्च करून ५०० किमी लांबीचा एक नवीन महामार्ग विकसित होणार असून या महामार्गाचे काम कॅलिफोर्निया येथे असणाऱ्या पॅसिफिक महामार्गाच्या धर्तीवर होणार आहे. मनमोहक आणि अथांग समुद्र किनारा, कोकणातील हिरवीगर्द, निसर्गरम्य, निसर्ग संपदा, ऐतिहासिक गड किल्ले, कोकणी परंपरा, सह्याद्रीच्या कुशीतील पर्वत रांगा, फेसाळते धबधबे, संथ वाहणाऱ्या नद्या, कोकणची खाद्यसंस्कृती, फळांच्या बागा यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि लवकर तसेच सुलभ प्रवास व्हावा यासाठी हा सुपरफास्ट महामार्ग कोकणचा कायापालट करील असे तज्ञांचे मत आहे.

मनमोहक समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वत रांगातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला समांतर राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत रेवस ते रेड्डी दरम्यान नवीन सुपर हायवे विकसित होणार आहे. या प्रकल्पांतर्गत सात नवीन पूल तयार होणार असून या पुलांची लांबी २७ किलोमीटर एवढी राहणार आहे. हा महामार्ग चार पदरी राहणार असून कोकणातील जवळपास ९० हून अधिक पर्यटनस्थळांना या महामार्गामुळे रस्त्याची नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

हा मार्ग मुंबई- रेवस – अलिबाग – काशिद – मुरुड -हरिहरेश्वर – गुहागर – गणपतीपुळे – रत्नागिरी – देवगड -मालवण – तेरेखोल असा राहणार आहे. यामुळे भविष्यात मुंबई ते गोवा हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करताना सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र ही वाहतूक कोंडी या नव्या महामार्गामुळे बऱ्या पैकी नियंत्रणात येईल आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास भविष्यात अगदीच सुरक्षित आणि जलद होणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे सोयीचे होणार आहे. कोकणातील एकात्मिक विकासाला आणि पर्यटनाला या प्रकल्पामुळे चालना मिळेल असा विश्वास तज्ञांनी देखील व्यक्त केला आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये