वैकुंठ रवी शेठ पाटील दहिहंडी; लाखोंच्या बक्षिसासाठी रंगणार “मनोऱ्यांचा थरार “
प्रतिनिधी - दिपक लोके (पेण)

पेण – रायगड जिल्हातील पेण ग्रामीण भागात सर्वात भव्य आणि लोकप्रिय असणारी युवाशक्ती वैकुंठ शेठ पाटील दहीहंडीचा थरार यावर्षी देखील रंगणार असून मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव दरवर्षी प्रमाणे साजरा होणार आहे. हा दहीहंडी उत्सव पेण ग्रामीण भागातील तांबटशेत, पेण वाशी, वडखळ या तीन गावात प्रत्येकी १ लाख १ हजार एकशे अकरा रुपये अश्या स्वरुपात तीन ग्रामीण भागातील मिळून ३ लाख ३ हजार ३३३ रूपये असे भव्य रोख रक्कम व विविध बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पत्रकारांना दिली.
तांबटशेत, पेण वाशी, वडखळ ठिकाणच्या चौकात दहीहंडीचे मनोरे उभा राहणार असून यासाठी ही लाखोंची बक्षिसे ठेवली आहेत. मुंबई ,पनवेल, पेण लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख, ३हजार ३३३ रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला पेणचे आमदार रवी शेठ पाटील, खा. धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाखांचे ३ हजार ३३३ रुपये असे पारितोषिक दिले जाणार आहे शिवाय वैकुंठ शेठ मित्र मंडळ दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर बक्षिसांचा देखील वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये तर सात थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विशेष उपाय योजना करण्यात आलेली आहे. एखादा गोविदा जखमी झाल्यास त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम असणार यंदाचे आकर्षण
दरवर्षीप्रमाणे तांबटशेत, वाशी गाव, वडखळ मैदानावर युवाशक्ती दहीहंडीसाठी नियोजन करण्यात आले असून डिजे रणजितसह, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रारंभी ढोलताशा पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. सर्वात वरच्या थरावरील गोविंदा चौदा वर्षाखालील असावा या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
वैकुंठ शेठ मित्र मंडळाचे दोनशे कार्यकर्ते नियोजन व सोहळ्यासाठी सज्ज!
वैकुंठ शेठ पाटील दहीहंडीचे प्रायोजक शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल वरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. वैकुठ शेठ पाटील दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार रवी शेठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. वैकुंठ शेठ मित्र मंडळ यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून युवाशक्तीचे वैकुंठ शेठ पाटील सुमारे दोनशे कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी पेण ग्रामीण वासियांनी दि. २७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले आहे.