विद्यार्थ्यांच्या आनंदात समरस होणाऱ्या आदर्श शिक्षिका.. स्नेहा टेंबे
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगाव )

माणगांव – विद्यार्थ्यांच्या सुखं – दुःखात समरस होऊन त्यांच्या जीवनात आणि चेहऱ्यावर सतत हास्य फुलविणाऱ्या तसेच त्यांना आदर्श नागरिक बनविण्यासाठी कायमस्वरूपी झटत असणाऱ्या आणि समाजातील वंचित, सोशिक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडविणाऱ्या अशोक दादा साबळे विद्यालयातील आदर्श शिक्षिका सौ. स्नेहा चंद्रकांत टेंबे या ठरल्या आहेत.
लहान विद्यार्थ्यांना हसत – खेळत शिकवताना शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात देतात. प्रत्येक मुलाची आत्मियतेने, आपुलकीने आणि आस्थेने चौकशी करून त्यांच्याच कुटुंबातील सदस्य बनण्यासाठी प्रयत्न केला आहे. ३३ वर्षाच्या शिक्षण दान यशस्वीपणे करीत असताना अनेक विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जुळले आहे. त्यांच्या हाताखालून शिकून उच्च पदावर असलेले विद्यार्थी टेंबे मॅडम यांची आवार्जुन उल्लेख करून आठवण काढतात तेव्हा त्यांना डोळ्यात आनंदाश्रू आवरता येत नाही.
एम.ए. मराठी विषय घेऊन उच्च पदवी धारण केलेल्या स्नेहा टेंबे यांनी पी.टी., स्काऊट, गाईड शिकवताना शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना विशेष वर्ग घेऊन प्रोत्साहन दिले. शाळेतील प्रत्येक समारंभात सुंदर रांगोळ्या काढून पाहूण्यांचे लक्ष वेधून घेतात. शीघ्र कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. निसर्गात रमायला आवडते. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेम देतात तेव्हढेच जीवापाड प्रेम शाळेवर करतात.
अनाथ, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कृती, सभ्यता आणि संस्कार मनावर बिंबवत असतात. अवगुण दूर करून सर्वगुणसंपन्न करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आई वडील यांना आदर्श मानणाऱ्या स्नेहा टेंबे यांना विविध प्रकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
राज्य स्तरावर बालकवी संमेलनात कविता वाचन केले आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रयोग करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न केले. त्या नवीन पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हा मिळालेल्या पुरस्कारा पेक्षा मोठा अन् लाखमोलाचा स्नेहा टेंबे मॅडम यांना वाटतो.