Join WhatsApp Group
आरोग्य व शिक्षण

वडिलांचे विधी महाविद्यालयाचे स्वप्न ॲड. राजीव साबळे यांनी प्रत्यक्षात साकार केले – ॲड. विनोद घायाळ

प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – आपले वडील स्व. माजी आमदार अशोक दादा साबळे यांनी माणगाव शहरात विधी महाविद्यालय असावे असे स्वप्न उराशी बाळगलेले होते. ते विधी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांचे सुपुत्र आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव अशोक साबळे यांनी विधी महाविद्यालय प्रत्यक्षात साकार केले आहे असे प्रतिपादन चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी या विधी महाविद्यालयात मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत. आज उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने नवे शैक्षणिक दालन खुले झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञानभांडार निरंतर मिळत राहून अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी पिडीतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आवाज उठवण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा मोठा लाभ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन अशोक दादा साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनी नवागत आणि नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यक्रम समारंभामध्ये केले.

कार्यक्रमाच्या  सुरवातीला नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन ॲड. विनोद घायाळ, डॉ. आबासाहेब पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार यांचे कलात्मक पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यानंतर अशोक दादा साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनी मनोगत वक्त करताना म्हणाले की, शेकडो विद्यार्थी पदवीचे शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात भटकंती करीत असतात. नोकरी, रोजगार किंवा व्यवसाय न मिळाल्याने सुशिक्षित बेरोजगारी नशीबी येत होती. मात्र राजीव साबळे यांनी विधी महाविद्यालय सुरू करुन एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोनं करून समाजात नावलौकिक मिळवाल असा विश्वास वाटतो. या महाविद्यालयात उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोन ठेवून दर्जेदार शिक्षण दिले जाते म्हणून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेत असतात याचा सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनी केले.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी सांगितले की, माणगाव नगरपंचायतीमध्ये खर्या अर्थाने महिला राज प्रस्थापित झाले आहे. १७ पैकी ९ नगरसेविका महिला निवडून आलेल्या आहेत. महायुतीचे नेते आणि आमचे मार्गदर्शक ॲड. राजीव साबळे यांनी महिलांप्रती जो विश्वास दाखवला आहे तो समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार आहोत. जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी कटीबद्ध राहून महिलांच्या अडीअडचणी सोडवू असा विश्वास व्यक्त केला. मी याच शिक्षण संस्थेत शिकून शिक्षक झाले आणि नगराध्यक्षा झाल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे संस्थेबद्दल ऋण व्यक्त करीत गौरवोद्गार काढले.

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सागरचे विशेष प्रतिनिधी अरुण पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत १ लाख ३२ हजार महिलांवर अत्याचार झाले तर ६० हजार लहान मुलांवरही अत्याचार झाले आहेत. दररोज १२१ महिला आणि मुली तर ५५ लहान मुलं अत्याचाराचे शिकार होत आहेत. हे अतिशय घृणास्पद आणि चिंतेची बाब बनत चालली आहे. यासाठी लवकरच शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहावे तरच हे विधी महाविद्यालय ॲड. राजीव साबळे यांनी सुरु केल्याचे सार्थकी लागेल असा दावा पत्रकार अरुण पवार यांनी केला.

अशोक दादा साबळे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲड. सोनाली बुरटे समारोप करताना म्हणाल्या की, आता महिला सशक्त होत आहेत. या महाविद्यालयात अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांचे उद्दीष्ट आणि हेतू अत्यंत सफल झाला आहे. या पूर्वी विधी महाविद्यालयात शिक्षण घेणे जिकिरीचं होतं. अशी महाविद्यालये केवळ मोठ्या शहरात होती. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणं अवघड आणि आव्हानात्मक होते. आता मात्र आपणास रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती माणगाव येथे कायद्याचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही खरंच भाग्यशाली आहात. अनुभवी शिक्षक, मोठी ग्रंथसंपदा, विविध प्रकारचे शिक्षण कक्ष, पायाभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या विधी महाविद्यालयाच्या बाजूलाच जिल्हा न्यायालय आहे. त्यामुळे त्यांचा लाभ घ्यावा. न्यायालय आणि विधी महाविद्यालय जवळजवळ असणारं आपलं एकमेव महाविद्यालय आहे याचा अभिमान वाटत आहे असे ॲड. सोनाली बुरटे सांगून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये