वडघर मुद्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
पाणी आडवा, पाणी जिरवा हे विधान प्रत्यक्ष सत्यात

प्रतिनिधी – नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे ) पाण्याची टंचाई हा नेहमीचा प्रश्न आहे. पाणीटंचाईमुळे खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यांत तसेच काही प्रमाणात शहरात राहणाऱ्या जनसामान्यांचे अतोनात हाल होतात. पिण्याच्या पाण्यासाठी आजही सर्वसामान्य जनतेला पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळते. हे हाल व संघर्ष टाळायचा असेल तर पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. आज निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण बेभरवशाचे झाले आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी व पृथ्वीचे वाढते तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवा हे विधान प्रत्यक्ष सत्यात उतरवण्याचे काम छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले आहे.
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे तथा कै. शंकर सिताराम देशमुख विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटील सर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वडघर मुद्रे गावाच्या हद्दीत असणाऱ्या नदीवजा ओढयावर वनराई बंधारा बांधला आहे. पालक – शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश खेडेकर, वडघर गावचे अध्यक्ष संजय गोलांबडे, हरिश्चंद्र धुमाळ यांनी श्रीफळ वाढवून या बंधाऱ्याच्या कामाची सुरूवात केली.
यावेळी मांजरवणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच आसमा अब्दुल जलिल फिरफिरे, पोलीस पाटील जलिल फिरफिरे यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. या वनराई बंधारा बांधल्यामुळे पृथ्वीचे वाढते तापमान नियंत्रित राखण्यासाठी तसेच पाण्याच्या पातळीत वाढ होऊन साठलेला पाणी परिसरातील गुरांना पिण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वनराई बंधारा प्रमुख राजन पाटील सर यांनी सांगितले.