राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई महानगर प्रदेश अध्यक्षपदी विलास गोरेगांवकर यांची नियुक्ती.
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे / माणगांव )

माणगांव – राष्ट्रीय चर्मकार संघ (रजि) ही चर्मकार समाजातील तसेच बहुजन समाजाच्या प्रगती व उन्नतीसाठी देशभर कार्यरत असणारी अराजकिय संघटना माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र अन्यायाच्या विरुद्ध व सर्वसामान्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देणारी लढाऊ संघटना असून गेल्या २५-३० वर्षापासून अनेकांचा आधार बनली आहे. आतापर्यंत ज्या- ज्या ठिकाणी देशभरात ढोर, लोहार,चर्मकार, बौद्ध, मातंग तसेच पीडित बहुजन बांधवांवर अन्याय-अत्याचार होतात. त्या ठिकाणच्या सरकारला व प्रशासनाला सळो की पळो करून सोडणारी ही संघटना असून आतापर्यंत राज्यात व देशभरात ढोर, लोहार, चर्मकार, बौद्ध, मातंग तसेच पीडित बहुजन बांधवांचा विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रम राष्ट्रीय चर्मकार संघामार्फत राबविले जातात. अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यासाठी तसेच संघटना बळकट करण्यासाठी चांगले कार्यकर्ते व पदाधिकारी घडविणे आणि भविष्यातील वाटचाल करणे हेही संघटना वाढीचेच महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी सातत्याने नवनवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या राष्ट्रीय चर्मकार संघ राज्यातून व देशभरातील कार्यकर्त्यांमधून करत असते. राज्यस्तरीय चर्मकार समाजाची भव्य चिंतन बैठक नुकतीच धारावी, मुंबई येथे संपन्न झाली. याच कार्यक्रमात मुंबईतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व त्यांच्या कार्यासाठी ज्यांना विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत असे मा. विलासजी गोरेगांवकर यांची मुंबई महानगर प्रदेश अध्यक्षपदी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
यावेळी त्यांना राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मा. बाबुरावजी माने साहेब, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. रामभाऊ कदम, महिला प्रदेशाध्यक्षा मनालीताई गवळी, समाजनेते नारायणजी गायकवाड, मा. परशुराम इंगोले साहेब, ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ, समाजनेते अँड. विठ्ठल कडवे, अँड. रमेश हंकारे जगन्नाथ खाडे सर, मा.सीमाताई कारंडे व मुंबईचे माजी अध्यक्ष मा. अँड. कैलाश आगवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व नियुक्तीपत्र देऊन नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मा. विलासजी गोरेगांवकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. श्री. विलासजी गोरेगावकर साहेब यांची जन्मभूमी माणगाव तालुक्यातील गोरेगाव तसेच कर्मभूमी मुंबई. मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास महाराज समितीच्यावतीने सन-२०१८ साली समाजभूषण पुरस्कारांसह त्यांच्या कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थांनी सुद्धा त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविले आहे. असा संयमी, शांत व अचूक निर्णयक्षमता असणारे मा.विलासजी गोरेगांवकर यांची राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई महानगर प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रायगड जिल्हा तसेच माणगाव तालुक्यातुन तसेच समाजातील विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असुन भविष्यात त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो अशा शुभेच्छा त्यांना अनेक मान्यवरांनी याप्रसंगी दिल्या.