माणगांवात सतत गाड्यांच्या रहदारीने नागरिक हैराण ; पादचारी पुल आणि सिग्नलची गरज
ट्रॅफिकमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना करावी लागते प्रतिक्षा...

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव शहरातील सततच्या वाहतुकीच्या कोंडीने ज्येष्ठ नागरिक, महिलांसह विद्यार्थी, लहान मुले हैराण झाले आहेत तसेच विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडताना नेहमी कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्गावर कचेरी आणि निजामपूर मार्गावरील चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी आणि पादचारी पूल बांधण्यात यावेत अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.
मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षे रखडलेल्या अवस्थेत आहे. माणगाव शहरातील बाजारपेठेतील महामार्गाचे रुंदीकरण अद्यापही झालेले नाही. माणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज हजारो लोक विविध प्रकारच्या कामांसाठी शहरात येत असतात. महामार्ग अरुंद असल्याने चालणे देखील अवघड आणि आव्हानात्मक झाले आहे. काही व्यावसायिकांनी बेकायदेशीर आणि अनाधिकृत बांधकामे करुन लहान मोठी दुकाने रस्त्यावर थाटली आहेत. रस्त्याने चालने देखील मुश्किल झाले आहे त्यामुळे निजामपूर आणि कचेरी मार्गावर पादचारी पूल बांधून नागरीकांना ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विद्यार्थ्यांना तर रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करुन आणि जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत जावे लागते तसेच रहदारी बंद होईपर्यंत बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्याकडून देखील सिग्नल सोबतच झेब्रा क्रॉसिंगची मागणी होत आहे.
बऱ्र्याच वेळा महिला आणि लहान मुलांना पोलिसांच्या मदतीने रस्ता सुरक्षितपणे पार करून पुढे जावे लागते. सततच्या रहदारीमुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत तर काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे शहरात पादचारी पूल आणि सिग्नल यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे असे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
माणगाव शहरातील लोकसंख्या, रहदारी, प्रवासी यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कळमजे जोड रस्त्या जवळील महामार्गाचा बाह्य वळण मार्गाचे काम ठप्प झाले आहे. तेथील कळमजे पुलाचे कामही अद्यापही झालेले नाही. काळ नदीच्या पुलाचे बांधकाम गेली कासवगतीने सुरू आहे ते पूर्ण झाले नाही. तसेच कोकणात जाण्यासाठी अन्य जवळचा मार्ग नसल्याने सातत्याने शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला नेहमीच धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी पादचारी पूल किंवा ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.