डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा पदविका निकाल रखडला ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापिठाचे प्रयत्न
तंत्र शास्त्र विद्यापीठात तंत्रज्ञान बिघडले ?

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव तालुक्यातील लोणेरे मधील जागतिक दर्जाचं विद्यापीठ असणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदविका विभागाचा गेल्या वर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल रखडल्याने या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे प्रवेश थांबले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे पुढील तंत्रशास्त्र विद्यापिठाचे तंत्रज्ञान बिघडले आहे अशी चर्चा आहे.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाला राज्यातील जवळपास सर्वच तंत्र महाविद्यालये संलग्न करण्यात आली आहेत . या विद्यापिठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांचा रिझल्ट विद्यापिठातून लावण्यात येतो. मात्र सॉप्टवेअर बंद असल्यामुळे गेल्यावर्षी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्कशीट अद्यापही दिल्या गेल्या नाहीत. दरम्यान प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर संपली असल्याने विद्यार्थ्यांना आता दंडाची रक्कम भरून प्रवेश घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्याचबरोबर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणेरे येथील इन्सिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक या पदविभागासह संलग्न सर्वच महाविदयालयातील विद्यार्थांना पुढील वर्षात प्रवेश घेणे अवघड झाले आहे . याबाबत अनेक विद्यार्थी विद्यापिठात येवून रिझल्टसाठी ठाण मांडून बसले आहेत. आयओपी मधील विद्यार्थी त्यांच्या संबधीत हेड ऑफ डिपार्टमेंट कडून त्यांच्या सहीने कागदांवर रिझल्ट लिहून आयओपीच्या प्राचार्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी सादर करतात. परंतु प्राचार्य मार्कशीट शिवाय प्रवेश देण्यास तयार नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
विद्यापिठाचे कुलगुरू डॉ . के . व्ही . काळे, परीक्षा नियंत्रक डॉ . नरेंद्र जाधव आणि आयओपीचे प्राचार्य डॉ . मधुकर दाभा डे यांची भेट घेवून प्रस्तुत प्रतिनिधीने वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता मार्कशीट तयार करणारे सॉफ्टवेअर गेल्या जानेवारी महिन्यापासून बंद असल्याने सर्वच विद्यार्थ्यांची मार्कशीट मॅन्युअल तयार करण्याचे काम सुरू आहे असे सांगून नवीन सॉप्टवेअर साठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहिता लागल्याने अंमलबजावणी करण्यास विलंब झाला होता. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र १० डिसेंबरपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना मार्कशीट दिले जाऊन १५ डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान ॲडमिशन घेण्याची मुदत देखील वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापिठात जे सॉफ्टवेअर वापरले जात होते . त्यामध्ये अनेक घोळ झाले असल्याचे निदर्शनास आल्यावर आम्ही ते सॉफ्टवेअर काढून टाकले असून त्याचे बिलही विद्यापिठाने दिलेले नाही आणि त्या सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे . नवीन सॉफ्टवेअर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून १० डिसेंबरपर्यंत रिझल्ट लावण्यात येतील आणि प्रवेशप्रक्रियाही १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल .
डॉ .के . व्ही . काळे
कुलगुरू
आयओपीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे मार्क विद्यापिठाला कळवण्यात आले असून जसजसे त्यांच्याकडून रिझल्ट लागून मार्कशीट येते तसतसे विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जात असून जवळपास ९० टक्के प्रवेशाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात येईल .
डॉ . मधुकर दाभाडे
प्राचार्य आय . ओ . पी .