विद्यार्थ्यांनी चपळता आणि अचूकतेचा संगम राखत उभारले चित्तथरारक मानवी मनोरे

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सवात सुधाकर शिपुरकर, गणेश वाघरे आणि मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चपळतेसह संतुलन साधत अचुकता दाखवून चित्तथरारक अनोखे मानवी मनोरे उभारले. कसलेल्या सरावतून चमकदार कवायती आणि कसरती पाहून क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ही शैक्षणिक संस्था नेहमीच एक पाऊल पुढे असते. त्याचाच अनुभव आणि प्रत्यय संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे आणि क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सिमलेस कंपनीचे उप व्यवस्थापक के.के. पांडे यांना आला. या कवायती मध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रंगीबेरंगी आकर्षक वेशभूषा आणि विविध खेळांच्या साहित्य वापरून विद्यार्थ्यांनी अशोक दादा साबळे शाळेचे मैदान सर केले. प्रत्येक मनोरा आणि कसरती सादर केल्यानंतर खेळाडूंना मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत आणि कौतुक केले जात होते.
सुरवातीला राष्ट्र गीत आणि क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. या महोत्सवात सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संस्थेच्या खेळाडूंनी राष्ट्रीय, राज्य आणि विदेशात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे.